सलीम शेख
माणगाव : माणगावात ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले. सदरचा गुन्हा शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १:५५ वाजण्याच्या सुमारास उपकोषागार कार्यालय माणगाव येथे घडला.
या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक मारुती रामचंद्र पवार (वय-५६) माणगाव उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी याने फिर्यादी यांच्या मुख्य कोषागार कार्यालय महर्षी कर्वे मार्ग दुसरा मजला मुंबई येथून मंजूर झालेली सुधारित आश्वासित प्रगती योजनेनुसार ग्रॅजूटीचा फरक ४५ हजार रुपये बँकेत जमा करण्याची मंजूरी देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी गुरुवार दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये ६ हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १:५५ वाजता फिर्यादी यांच्याकडून उपकोषागार कार्यालय माणगाव येथे पंच साक्षीदारासमक्ष लोकसेवक आरोपी मारुती रामचंद्र पवार यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खाते रायगड-अलिबागच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेने माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. २९७/२०२३ भ्रष्टचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अँटीकरप्शन ब्युरो रायगड-अलिबाग पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी हे करीत आहेत.
