अलिबाग: रामधरणेश्वर डोंगराच्या सोगाव भागात अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक झाली. दुष्काळ आणि उष्णतेच्या काळात लागलेल्या या आगीमुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे येण्याची व पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती निर्माण झाली असून, वनविभागाने गस्त वाढवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सोगाव येथील रामधरणेश्वर डोंगरावर लागलेला वणवा विझवताना पर्यावरण प्रेमी सचिन घाडी,
सोगाव/अलिबाग (अब्दुल सोगावकर)
अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगराच्या सोगाव परिसरात मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी सचिन घाडी यांनी यश माने व सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
जाहिरात (Advertisement)
यंदा अलिबाग तालुक्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे आधीच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून वातावरणात कमालीचा उष्णतेचा पार वाढला आहे. अशातच डोंगरांना लागणाऱ्या वणव्यांमुळे तापमान आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या आगीत दुर्मिळ वनस्पतींसह वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास जळून नष्ट झाले आहेत. अन्न व निवाऱ्याचा शोध घेण्यासाठी बिबट्या, तरस, रानडुकरे, माकडे आणि सरपटणारे प्राणी मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे नागरिक व पशुधनाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय रामधरणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील हजारो शेतकर्यांची गुरे-ढोरे याच डोंगरावर चरत असतात. वणव्यात चारा जळाल्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ येऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वनविभागाने अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि डोंगर भागात कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी सचिन घाडी यांनी केली आहे.