मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

पेणमध्ये अत्याधुनिक टर्फ इनडोअर क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

पेण नगरपरिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या टर्फ इनडोअर क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते झाले. या सुविधेमुळे रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना पावसाळ्यासह वर्षभर क्रिकेट सरावाची उत्तम संधी मिळणार आहे.
मुख्य संपादक
गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ८:१२ ● ४३२ वाचन (Views)
पेणमध्ये अत्याधुनिक टर्फ इनडोअर क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
जाहिरात (Advertisement)
पेण (क्रीडा प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणालगत पेण नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्फ इनडोअर क्रिकेट स्टेडियमचा भव्य लोकार्पण सोहळा काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला. या आधुनिक सुविधेमुळे आता पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना वर्षभर (बाराही महिने) सरावाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

जाहिरात (Advertisement)
या सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, नगरपरिषदेचे सभागृह नेते तथा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (RDCA) अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक समीर मसुरकर, सुमित झुंझारराव, पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह विविध अधिकारी, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्यातील सरावाचा अडथळा दूर होणार: नगराध्यक्षा प्रीतम पाटील

रायगड जिल्ह्याला क्रिकेटची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र, पावसाळ्यातील चार महिने मैदानी सरावात मोठ्या अडचणी येतात. ही अडचण दूर करून जिल्ह्यातील मुला-मुलींना वर्षभर सराव करता यावा, याच उद्देशाने हे इनडोअर स्टेडियम उभारण्यात आले आहे. या सुविधेमुळे रायगडच्या क्रिकेटला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी व्यक्त केला.

मोठी स्वप्ने पाहा, सातत्याने सराव करा: केदार जाधव

खेळाडूंना मार्गदर्शन करताना केदार जाधव म्हणाले की, खेळाडूंनी नेहमी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. स्वप्नपूर्तीसाठी सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि कठोर मेहनत आवश्यक आहे. या सुविधेचा पुरेपूर वापर करून रायगडच्या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

पेणचा आगामी काळात कायापालट होणार: मंत्री अदिती तटकरे

पेण नगरपरिषद नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने उत्तम वाटचाल करत असल्याचे सांगत मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, पेण तालुका आता 'तिसरी मुंबई' म्हणून विकसित होत आहे. अशा परिस्थितीत मैदाने आणि इनडोअर स्टेडियमसारख्या क्रीडा सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे.

.

आरडीसीए (RDCA) क्रिकेट अकॅडमीचेही उद्घाटन

या सोहळ्याचे औचित्य साधून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट अकॅडमीचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे आउटडोअरसोबतच इनडोअर अकॅडमीद्वारे खेळाडूंना वर्षभर उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

उदयोन्मुख खेळाडू व मार्गदर्शकांचा विशेष सत्कार

या प्रसंगी महाराष्ट्राची क्रिकेटपटू रोशनी पारधी हिच्या वतीने तिच्या पालकांचा (श्री. व सौ. रवींद्र पारधी) तसेच महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, मुख्य निवडकर्ता पुष्कराज चव्हाण आणि माजी रणजीपटू योगेश पवार यांचा क्रिकेटमधील बहुमूल्य योगदानाबद्दल बहुमान करण्यात आला. तसेच अमिषा बामणे, समृद्धी कांबळे, समिधा तांडेल आणि काजल साळुंखे या युवा महिला क्रिकेटपटूंना संपूर्ण क्रिकेट किट देऊन गौरविण्यात आले.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

रायगडच्याकौस्तुभ म्हात्रेची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड; पेण तालुक्यासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि पेण स्पोर्ट्स असोसिएशनचा गुणवान युवा वेगवान गोलंदाज कौस्तुभ हेमंत म्हात्रे याची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील (अंडर-२३) मुलांच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे.

रायगडच्या रोशनी पारधीची बीसीसीआयच्या 'वुमेन्स चॅलेंजर्स' स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र संघातून चार खेळाडूंची वर्णी; रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून रोशनीचा सत्कार क्रीडा प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) व एसबीसी क्रिकेट अकॅडेमी (महाड) ची गुणवान अष्टपैलू ...

रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रोहा संघाची बाजी; चुरशीच्या अंतिम सामन्यात अलिबागचा निसटता पराभव

महाड येथे संपन्न झालेल्या भव्य कबड्डी चषकात रोहा संघाने अटीतटीच्या लढतीत ३ गुणांनी विजय मिळवून चॅम्पियनशिप पटकावली.