उरण । घन:श्याम कडू : द्रोणागिरी नोड सेक्टर-५० मधील निर्मल हाईट्स परिसरात रात्री कुटुंबासोबत फेरफटका मारणाऱ्या एका स्थानिक रहिवाशावर आणि त्यांच्या कुटुंबावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे.
या हल्ल्यामध्ये तक्रारदारासह त्यांच्या पत्नी व ७ वर्षांची लहान मुलगी गंभीर जखमी होण्यापासून बालंबाल बचावले आहेत. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल
घटनेनंतर पीडित कुटुंबाने तातडीने उरण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये १५ जणांच्या टोळक्याविरोधात दंगल माजवणे, प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करणे आणि शांतता भंग करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्रीच छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे द्रोणागिरी आणि उरण परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.