रायगड

उभ्या भातपिकात पोकलेन फिरवून ‘गेल’ कंपनीची मुजोरी; उरणमध्ये शेतकरी आक्रमक

प्रस्तावित गॅस पाईपलाईनसाठी हातातोंडाशी आलेला घास हिरावला | शेतकरी वर्गातून तीव्र संतापाची लाट

उरण । अनंत नारिंगीकर
एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला असताना, दुसरीकडे ‘गेल इंडिया लिमिटेड’ (GAIL India) कंपनीच्या मुजोर कारभारामुळे उरण तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून कंपनी व्यवस्थापनाने पोकलेन मशिनच्या साहाय्याने उभ्या भातपिकात घुसून प्रस्तावित गॅस पाईपलाईनचे काम सुरू केल्याने उरणमधील बळीराजा अत्यंत आक्रमक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गेल इंडिया’च्या प्रस्तावित गॅस पाईपलाईन प्रकल्पाला महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. रायगड जिल्ह्यातील पेण आणि उरण तालुक्यातील सुपीक शेतजमिनींमधून जाणाऱ्या या पाईपलाईनच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. असे असतानाही, कंपनी प्रशासनाने पोलीस बळाचा आणि मानवी हस्तक्षेपाचा वापर करत थेट शेतात पोकलेन उतरवले.

ऐन कापणीच्या तोंडावर असलेल्या सुपीक भातपिकाची नासधूस झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक पार वाया गेली आहे. “हातातोंडाशी आलेला घास या कंपनीने हिरावून घेतला आहे,” असा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे उरण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!