वाचन हा एक उत्तम छंद आहे तो प्रत्येकाने जोपासावा -डॉ. संतोष मोरे
माणगाव : वाचणे हा एक उत्तम छंद आहे. वाचन वेगवेगळया भाषेत करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. मराठीतून वाचन करण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देत असल्याचे मत डॉ. संतोष मोरे यांनी मांडले.
माणगाव तालुक्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा उतेखोल येथे वाचन संस्कृतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉ. संतोष मोरे बोलत होते. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उत्तम पाटील, प्राथमिक चे मुख्याध्यापक अरुण पाटील, किरण मोरे, मयुरी भगत, अंकुश काळे, प्रवीण पाटील आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण प्रचलित आहे. वाचन असेल तरच वचनात सक्षमता येऊ शकते. वाचनामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात. तसेच वाचनामुळे भाषा शुद्ध होते व विचारांची देवाणघेवाण होते. वाचन ही मनाला समृद्ध करणारी आणि व्यक्तीमत्त्व विकासाचा पाया असणारी एक अत्यंत महत्त्वाची सवय आहे.
वाचनामुळे आपल्या ज्ञानात आणि माहितीत सतत भर पडते. नवीन विषयांची ओळख होते. कल्पनाशक्ती वाढते व पुस्तकांमधील शब्द वाचून आपण स्वतःची अशी एक कल्पनाविलस सृष्टी तयार करतो, ज्यामुळे सर्जनशीलता सुधारते. नियमित वाचल्याने नवीन शब्द आणि वाक्यरचना समजतात. यामुळे भाषेवर आणि संवादावर उत्तम पकड निर्माण होते. वाचन केल्याने मेंदू सक्रिय राहतो. यामुळे एकाग्रता वाढून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात मन शांत होते. दैनंदिन ताणतणाव विसरून मानसिक विश्रांती मिळण्यास मदत होते.
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आजची पिढी वाचनाच्या सवयीपासून दूर होत चालली आहे. मी असे म्हणत नाही की हे प्लॅटफॉर्म महत्त्वाचे नाहीत परंतु प्रत्येक गोष्टीसाठी इष्टतम वेळ दिला पाहिजे. आपल्यापैकी किती जण नियमित वाचन करतात? शाळा, महाविद्यालयातील मुलं तर वाचनाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. वाचन ही एक सुंदर कला आहे आणि प्रत्येकाने ती जोपासण्याची गरज आहे.
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो आणि ते योग्यरीत्या वापरतो. वाचन हे प्रत्येक गोष्टीबद्दल काहीही शिकण्याचा प्रवेशद्वार आहे. जितके जास्त वाचाल तितके जास्त ज्ञान मिळेल असे डॉ. संतोष मोरे यांनी सांगितले.
