श्रीवर्धन पोलिसांची मोठी कारवाई; ४ कोटींची ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त, ३ तस्करांना ठोकल्या बेड्या
जिवणा कोळीवाडा परिसरात पोलिसांचा छापा | ३.९६ किलो ॲंबरग्रीससह मोटरसायकल हस्तगत
श्रीवर्धन । संदेश घोलप
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध वन्यजीव तस्करीविरोधात धडक कारवाई करत सुमारे ३ कोटी ९६ लाख ६० हजार रुपये किमतीची ‘ॲंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केली आहे. या प्रकरणी जिवणा कोळीवाडा येथील तीन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.
गुप्त बातमीवरून रचला सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका मोटरसायकलवरून (क्र. MH 06 CV 3810) बेकायदेशीरपणे ॲंबरग्रीसची वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख व पथकाने जिवणा पार नाका येथे नाकाबंदी करून संशयित मोटरसायकलचालक विराज महेंद्र चौलकर (वय २५, रा. जिवणा कोळीवाडा) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता ६०४ ग्रॅम ॲंबरग्रीस आढळून आले.
अटक केलेल्या आरोपींची कबुली अन् मुख्य साठा उघड
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने हा साठा गावातीलच ऋतुराज रामचंद्र रघुवीर (वय १९) व त्याचे वडील रामचंद्र रघुवीर (वय ४६) यांच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने रघुवीर यांच्या घरावर छापा टाकून तेथून आणखी ३.३५६ किलोग्राम ॲंबरग्रीस जप्त केले. या संपूर्ण कारवाईत एकूण ३.९६० किलोग्राम ॲंबरग्रीस (बाजारभाव रु. ३ कोटी ९६ लाख) आणि ६० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण सुमारे ४ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
न्यायालयाने तिन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू सोनावणे व पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजयकुमार देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
रायगड पोलिसांचे आवाहन:
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार ॲंबरग्रीस बाळगणे अथवा खरेदी-विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. समुद्रकिनारी किंवा अन्य कुठेही असा संशयास्पद पदार्थ आढळल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.
