उरण महसूल विभागाला एसीबीचा दणका; १ लाखाच्या लाचप्रकरणी मोहितेंसह तिघेजण जाळ्यात
कोप्रोली मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल ताब्यात | दप्तरदिरंगाई व भ्रष्टाचाराविरोधात उरणमध्ये तीव्र संताप
उरण । घन:श्याम कडू
शासकीय कामांसाठी सामान्य नागरिकांना हेलपाटे मारायला लावून लाच उकळणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. उरण तालुक्यातील कोप्रोलीचे मंडळ अधिकारी के. डी. मोहिते, चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी आणि कोतवाल नथुराम कातकरी या तिघांना लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे उरणच्या महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिरनेर येथील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील फेरफार नोंद मंजूर करणे, खातेफोड व संबंधित महसूलविषयक काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. वारंवार हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने संतप्त तक्रारदाराने पैसे देण्याऐवजी थेट एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून रचलेल्या सापळ्यात तिघेही संशयित रंगेहाथ पकडले गेले.
दरम्यान, मंडळ अधिकारी मोहिते यांच्यावर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्यामुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून उरण-कोप्रोली परिसरात ठाण मांडून असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मोहिते यांच्या कार्यकाळातील महसूल व्यवहार, फेरफार नोंदी, जमीन हस्तांतरणे आणि त्यांच्या अफाट मालमत्तेची अपसंपदा (Disproportionate Assets) कायद्यांतर्गत स्वतंत्र सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
एसीबीच्या या कारवाईमुळे ‘शासकीय सेवा की वसुली केंद्र?’ असा संतप्त सवाल उरणकर उपस्थित करत आहेत. सध्या तिन्ही संशयितांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून उरण पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणा मध्यस्थाचा सहभाग आहे का, याचाही तपास एसीबीचे पथक करत आहे.
