नियोजित एमआयडीसीच्या कामावर टोळक्याचा राडा; खंडणीसाठी कामगारांना बेदम मारहाण
कोलाड पोलिसांत गुन्हा दाखल | काम बंद पाडत जीवे मारण्याची धमकी
धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील पहूर आणि जाधववाडी परिसरातील नियोजित एमआयडीसीच्या विकासकामाच्या ठिकाणी बेकायदेशीर टोळक्याने राडा घालत कामगारांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “आम्हाला काम द्या, नाहीतर खंडणी द्या” अशी मागणी करत या टोळक्याने पोकलेन व हायवा डंपरचालकांना काठीने मारहाण करून काम बंद पाडले. पुन्हा काम सुरू केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात ५ ते ६ जणांच्या टोळक्याविरोधात विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूलतः धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील रहिवासी व सध्या कोलाड रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेले फिर्यादी हे आपल्या सहकाऱ्यांसह पहूर-जाधववाडी हद्दीत रस्ते विकासाचे काम करत होते. काम सुरू असतानाच एका संशयिताने इतर दोन मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून ५ ते ६ साथीदारांसह घटनास्थळी बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी कामगारांना अडवून, “येथे काम करायचे असल्यास आम्हाला कामावर ठेवा किंवा पैसे द्या” अशी दमदाटी केली.
फिर्यादींनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवताच आरोपींनी हातातील काठीने फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर हल्ला चढवला. या मारहाणीत कामगार गंभीर जखमी झाले आहेत. “पुन्हा काम सुरू केल्यास हातपाय तोडून टाकू,” असा इशारा देत आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेनंतर पीडितांनी तातडीने कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३०८(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांमध्ये खंडणी उकळण्याच्या उद्देशाने दहशत माजवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक करत आहेत.
