श्रीवर्धन तालुक्यात शेतकरी संकटात; कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
श्रीवर्धन (अनिकेत मोहित) : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत आलेली भातशेती आता रानडुकरांच्या हैदोसामुळे संकटात सापडली आहे. भातपीक बहरत असतानाच रानडुकरांचे कळप रात्रीच्या वेळी शेतांमध्ये घुसून उभे पीक तुडवत असून, भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या भातशेती बहरली आहे. मात्र, काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसतात. भाताची रोपे तुडविण्यासह तयार होत असलेल्या भाताचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
गतवर्षी पंचनामा; यंदाही नुकसान
गतवर्षीही श्रीवर्धन परिसरातील अनेक शेतकऱ्यांना रानडुकरांच्या उपद्रवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळाली होती. मात्र, वर्ष उलटले तरी रानडुकरांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाय झालेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदाही भातशेतीचे नुकसान सुरू झाले असून, संबंधित विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
शेतीकडे पाठ फिरविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट
आधीच शेतीचा वाढता खर्च, मजुरांची कमतरता, हवामानातील बदल आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अनेक तरुण शेतीपासून दूर जात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेती करूनही दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत राहिले, तर उरलेले शेतकरीही शेती सोडण्याच्या विचारात पडतील, अशी चिंता व्यक्त होत आहे.
भातशेती हा कोकणातील शेतकऱ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाकडे केवळ नुकसानभरपाईच्या दृष्टीने न पाहता, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. वनविभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना, नुकसानीचे तातडीने पंचनामे आणि नुकसानभरपाई याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा, नैसर्गिक संकटांबरोबरच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे श्रीवर्धनमधील भातशेतीचे क्षेत्र आणखी कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
