१ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ची धडक कारवाई; प्रशासकीय वर्तुळात खळबळ
अलिबाग: रायगड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी एक मोठी कारवाई करत प्रशासकीय व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक (PA) योगेश भस्मे यांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेत सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत तक्रारदार शिक्षकाला त्यांच्या पसंतीच्या किंवा सोयीच्या ठिकाणी बदली मिळवून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी १ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने तक्रारदाराने याप्रकरणी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (रायगड) यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त होताच ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदाराकडून ठरलेली १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने भस्मे यांना रंगेहात पकडले. कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या थेट संपर्कात असलेल्या आणि महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या स्वीय सहाय्यकावरच ही कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक बदल्यांमधील या भ्रष्टाचाराचे धागेदोर आणखी कुठे पसरले आहेत का आणि यात अन्य कोणत्या अधिकाऱ्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता अधिक तपास करत आहे.
