महाराष्ट्र संघातून चार खेळाडूंची वर्णी; रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून रोशनीचा सत्कार
क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) व एसबीसी क्रिकेट अकॅडेमी (महाड) ची गुणवान अष्टपैलू खेळाडू कु. रोशनी रवींद्र पारधी हिची बीसीसीआय आयोजित १९ वर्षांखालील 'वुमेन्स चॅलेंजर्स टी-२०' क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एकूण चार खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये रायगडच्या रोशनी पारधीसह भाविका अहिरे, ईश्वरी आस्वारे आणि ग्रीशा कटारिया यांचा समावेश आहे.
रोशनीच्या या घवघवीत यशाबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य अँड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, संदीप जोशी व प्रशिक्षक तहा चिचकर यांनी महाड येथील तिच्या निवासस्थानी जाऊन तिचा विशेष सत्कार केला.कष्टाचे फळ आणि भविष्यातील भारतीय संघाचे स्वप्न
या प्रसंगी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी रोशनीसह तिचे पालक व प्रशिक्षक आवेश चिंचकर आणि बशीर चिंचकर यांचे कौतुक केले.
"अत्यंत कमी वयात व कठोर परिश्रमांच्या जोरावर रोशनीने महाराष्ट्राच्या महिला संघात स्थान मिळवले आहे. आता बीसीसीआयच्या वुमेन्स चॅलेंजर्स स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर लवकरच तिची निवड भारतीय महिला संघात व्हावी, हीच संपूर्ण रायगडवासीयांची इच्छा आहे," असा विश्वास अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केला.
पालकांचे पाठबळ आणि सहकार्याची ग्वाही
सर्वसामान्य कुटुंबातील रोशनीचे वडील रवींद्र पारधी यांनी गरिबीवर मात करत तिला नेहमीच क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या त्यागाचा व खंबीर पाठिंब्याचा संपूर्ण रायगडला अभिमान असल्याचे पाटील यांनी नमूद केले. तसेच, रोशनीच्या भावी वाटचालीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह सर्व राजकीय पक्षांचे नेते व स्थानिक नागरिक पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.