महाड तालुक्यातील दहिवड आणि वाळण परिसरातील जंगलात पंदेरी गावचे ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्राथमिक संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाड (मिलिंद माने)
महाड तालुक्यातील दहिवड आणि वाळण गावांच्या हद्दीतील जंगल परिसरात एका ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. गजानन विठ्ठल गाढवे असे मृत ग्रामसेवकाचे नाव असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
जाहिरात (Advertisement)
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन गाढवे हे मूळचे मेहकर (जि. बुलढाणा) येथील रहिवासी असून सध्या महाड तालुक्यातील शिरगाव येथे वास्तव्यास होते. ते महाड तालुक्यातील पंदेरी गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.
महाड औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गाढवे हे आपले कामकाज आटोपून महाडच्या दिशेने परतत होते. दरम्यान, दहिवड आणि वाळण गावांच्या हद्दीत रस्त्यालगत स्वतःची दुचाकी उभी करून ते जंगलाच्या दिशेने गेले. त्यानंतर जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आनंद रावडे व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी महाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, कर्तव्यदक्ष ग्रामसेवकाच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे महाड तालुक्यात शोककळा पसरली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. आत्महत्येचा संशय व्यक्त होत असला तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती महाड एमआयडीसी पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.