• Mon. Dec 15th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव–इंदापूर बायपास महामार्गाचे काम वेगात; पावसाळ्यापूर्वी निर्णायक टप्पा

ByEditor

Dec 13, 2025

८ पुलांची कामे समांतर सुरू, ४००हून अधिक कामगार अहोरात्र कार्यरत

मे पर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुंबई–गोवा महामार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार

माणगाव । सलीम शेख
कोकणच्या दळणवळणाचा कणा असलेल्या मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव–इंदापूर बायपासच्या कामाला अखेर अपेक्षित गती मिळाली आहे. माणगावजवळील कळमजे ते मुगवली जोड रस्ता तसेच इंदापूर बायपास या दोन्ही ठिकाणी कामे युद्धपातळीवर सुरू असून, या मार्गावरील लहान-मोठ्या आठ पुलांची उभारणी एकाच वेळी केली जात आहे. सध्या ४००हून अधिक कामगार, अभियंते व तांत्रिक कर्मचारी दिवसरात्र काम करत असून, पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची टप्प्याटप्प्याची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

पेण येथील मुख्य कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यापर्यंत बायपासची किमान एक मार्गिका पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे माणगाव व इंदापूर शहरातून जाणारी जड वाहतूक बायपासवर वळवता येणार असून, शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि प्रवाशांचा वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच संपूर्ण मुंबई–गोवा महामार्ग २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ठप्प कामातून वेगाकडे

माणगाव व इंदापूर बायपासचे काम अनेक वर्षे रखडलेले होते. मागील ठेकेदाराने काम अत्यंत संथ गतीने केल्याने ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर बराच काळ काम ठप्प राहिल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला होता. व्यापारी, विद्यार्थी, प्रवासी आणि रुग्णवाहिका यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. राजीव साबळे यांनी माणगाव शहरातील नागरिकांना एकत्र करत आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्र स्तरावर पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रकल्पातील अडथळ्यांची माहिती दिली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने घडल्या आणि काम पुन्हा सुरू झाले.

सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अडचणींचे निराकरण

खासदार सुनील तटकरे यांनी या महामार्गाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत दरमहा संबंधित अधिकारी, कंत्राटदार व यंत्रणांच्या आढावा बैठका घेतल्या. वनविभागाची परवानगी, कोकण रेल्वे समन्वय, भूसंपादन, पुनर्वसन, मोबदला व नुकसानभरपाई यांसारख्या गुंतागुंतीच्या बाबी टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात आल्या. परिणामी आर्थिक व प्रशासकीय अडथळे दूर होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळाली.

नेमकी कोणती कामे सुरू?

सध्या बायपास मार्गावर आठ पुलांची उभारणी, सर्व्हिस रोडची कामे, बायपासचा मुख्य रस्ता, काँक्रीटीकरण, गडर बसविणे, मातीचा भराव, रस्ता मजबुतीकरण, ड्रेनेज व सुरक्षेसाठी आवश्यक संरचना अशी अनेक कामे समांतर सुरू आहेत. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून दर्जेदार व टिकाऊ काम करण्यावर भर दिला जात आहे.

जनतेला मोठा दिलासा

मे पर्यंत एक मार्गिका सुरू झाल्यास माणगाव व इंदापूर परिसरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास वेळेत व सुरक्षित होईल, व्यापार-उद्योगाला चालना मिळेल आणि कोकण पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही मोठा फायदा होणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात वेगात सुरू झालेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, उर्वरित कामही नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!