रायगड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील खोपोली येथील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येवरून जिल्ह्याचे राजकारण कमालीचे तापले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे. सुनील तटकरे यांनी थोरवे यांच्याविरोधात माणगाव सत्र न्यायालयात ६५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून, यामुळे महायुतीतील दोन मित्रपक्षांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
खोपोली या औद्योगिक शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश काळोखे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. या हत्येमागे राजकीय सूडभावना असल्याचा आरोप करत थोरवे यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
आमदार थोरवेंचे खळबळजनक आरोप
कर्जत येथे २७ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या एका मुलाखतीत आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर बोचरी टीका केली होती. “रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू झाले असून सुनील तटकरे हे रायगडचे ‘आका’ बनले आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना मारण्याचे कट तटकरेंच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी रचले जात आहेत,” असा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केला होता. तसेच, मुख्य आरोपी रवी देवकर याने हत्येच्या दोन दिवस आधी तटकरेंची भेट घेतली होती, असा दावाही त्यांनी केला होता.
सुनील तटकरे यांनी सुरुवातीला थोरवे यांना आरोपांबाबत सावध राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, थोरवे यांनी आपल्या आरोपांची धार कमी न केल्याने तटकरे यांनी कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आपल्या राजकीय कारकीर्दीला आणि प्रतिमेला या बिनबुडाच्या आरोपांमुळे मोठा धक्का बसल्याचे नमूद करत, तटकरे यांनी ६५ कोटी रुपयांच्या भरपाईसाठी माणगाव न्यायालयात धाव घेतली आहे.
राजकीय संघर्षाचे पडसाद
एकीकडे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत असताना, रायगडमध्ये मात्र दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते समोरासमोर ठाकले आहेत. या कायदेशीर लढाईमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवा ‘स्फोट’ झाला असून, आगामी निवडणुकांवर याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
