माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पोलादपूर तालुक्यातील घटना
माणगाव (सलीम शेख): अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ वर्षे ७ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. शुभम गजानन वनारसे (वय २१, रा. खडकवणे दत्तवाडी, ता. पोलादपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना न्यायालयाकडून कडक संदेश देण्यात आला आहे.
ही थरारक घटना २७ ऑगस्ट २०१९ रोजी पोलादपूर तालुक्यातील मौजे सावंतकोंड येथे घडली होती. पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांच्या गुरांच्या वाड्याजवळ असताना, आरोपी शुभम याने तिथे येऊन पीडितेच्या तोंडात ओढणी कोंबून आरडाओरडा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केले आणि तो मोटारसायकलवरून पसार झाला.
या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३९२, ३५४, ५०४, ५०६ सह पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदवल्या. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एस. टी. भालेराव यांनी आज, १६ मार्च २०२६ रोजी निकाल देताना आरोपी शुभम वनारसे याला दोषी धरले. न्यायालयाने त्याला ६ वर्षे ७ महिने सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्याच्या यशासाठी पैरवी अधिकारी आणि पोलादपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
