• Sun. Sep 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

काळाचौकीत महागणपती मंडळाच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागून २ जणींचा मृत्यू, ४ जखमी

ByEditor

Sep 20, 2026

मुंबई : काळाचौकीत महागणपती मंडळाच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागून २ जणींचा मृत्यू, ४ जखमी८ वर्षांच्या चिमुकलीसह ३३ वर्षीय महिला दगावली; एका १२ वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनकमुंबई (विशेष प्रतिनिधी):काळाचौकी येथील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का (इलेक्ट्रिक शॉक) लागून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका ८ वर्षांच्या चिमुकलीसह दोन जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य ४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका १२ वर्षांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे २.४२ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या दिग्विजय मिल चाळीजवळ महागणपती उत्सव मंडळाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराजवळच पिण्याच्या पाण्याचा आणि थंड पेयाचा एक तात्पुरता स्टॉल उभारण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास या स्टॉलमध्ये अचानक वीजप्रवाह उतरला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना विजेचा भीषण धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशामक दल, ‘बेस्ट’चे अधिकारी आणि काळाचौकी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने तातडीने परिसर निर्मनुष्य करत वीजपुरवठा खंडित केला. सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा अंशतः बंद ठेवण्यात आला होता. ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत, गणपती उत्सवाच्या रोषणाईसाठी व स्टॉलसाठी उभारलेल्या तात्पुरत्या मीटरमधील वायरिंग स्थानिक इलेक्ट्रिशियनने आधीच तोडली असल्याचे आढळून आले.

मृत व जखमींचा तपशील

मृतांची नावे

रागिणी घनश्याम यादव (वय ८ वर्षे) – मसिना हॉस्पिटल येथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित.

सुजाता (वय ३३ वर्षे) – ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित.

जखमींची प्रकृती:

रुही सिंग (वय १२ वर्षे) – प्रकृती चिंताजनक; ग्लोबल हॉस्पिटलच्या आयसीयू (ICU) मध्ये उपचार सुरू.

किरण अकबर नाईक (वय १९ वर्षे) – प्रकृती स्थिर (मसिना हॉस्पिटल).

तन्वी नरेश हांडे (वय १९ वर्षे) – प्रकृती स्थिर (मसिना हॉस्पिटल).

साहिल संदीप तरे (वय १९ वर्षे) – प्रकृती स्थिर (मसिना हॉस्पिटल).

सदर घटनेनंतर काळाचौकी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि बेस्टचे मीटर इन्स्पेक्टर घटनास्थळी कसून पाहणी करत आहेत. स्टॉलमध्ये वीजप्रवाह नक्की कशामुळे उतरला आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, याचा पुढील तपास काळाचौकी पोलीस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!