• Wed. Sep 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ, लेझर लाईट्स अन् स्प्रे वापरावर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई

ByEditor

Sep 16, 2026

रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; नागरिक आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी निर्णय

अलिबाग : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्न पार पडाव्यात, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईट्स, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रेच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून, याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले असून, रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दि. १९ सप्टेंबर २०२६ (सहावा दिवस) आणि दि. २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) या विसर्जनाच्या मुख्य दिवशी हे निर्बंध कठोरपणे पाळले जाणार आहेत.

बंदी घालण्याचे प्रमुख कारण

  • आरोग्याची हानी: तीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे (डीजे/डॉल्बी) नागरिकांना बहिरेपणा येणे, हृदयविकाराचा झटका येणे यांसारखे गंभीर आजार उद्भवल्याचे निदर्शनास आले आहे.
  • दृष्टीस धोका: तीव्र क्षमतेच्या लेझर बीम लाईट्समुळे नागरिक, बालके तसेच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत.
  • असुरक्षित घटक: केमिकल व स्नो स्प्रेमुळे त्वचा आणि श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

कडक कारवाईचा इशारा

या आदेशाचे उल्लंघन करून मिरवणुकीत डीजे, लेझर लाईट्स किंवा स्प्रेचा वापर करताना आढळल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, गणेशोत्सव मंडळ व चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कठोर आणि दंडनीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!