‘शेती वाचवा, गाव वाचवा’चा हुंकार; जमीन न विकण्याचे शेतकरी-युवांना आवाहन
उरण । घनःश्याम कडू
गणपती बाप्पाच्या उत्सवाला सामाजिक प्रश्नांची जोड देत उरणमध्ये ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाविरोधातील लढ्याची जनजागृती थेट गणेशोत्सवाच्या देखाव्यातून करण्यात आली आहे. उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या ‘एमएमआरडीए केएससी नवनगर’ म्हणजेच ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाला स्थानिक शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध असून, आता या विरोधाचा आवाज गणेशोत्सवाच्या माध्यमातून घुमू लागला आहे.
राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्यापासून या आंदोलनाला अधिक वेग आला आहे. एकीकडे सरकार प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे शेतकरी संघटना १२४ गावांमध्ये जनजागृती करत विरोधाची धार वाढवत आहेत.

देखाव्यातून नागरी व ग्रामीण जीवनाचा विरोधाभास
‘एमएमआरडीए केएससी नवनगर (तिसरी मुंबई) विरोधी शेतकरी समिती, रायगड’चे सरचिटणीस रूपेश पाटील यांनी आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून शहरी आणि ग्रामीण जीवनातील फरक प्रभावीपणे मांडला आहे. एका बाजूला सिमेंटची जंगले व टोलेजंग इमारती, तर दुसऱ्या बाजूला शेती, घरे आणि समृद्ध ग्रामीण संस्कृतीचे चित्र उभे केले आहे.
“शेतीची जमीन आणि गावच उरले नाही, तर आमचे सण-उत्सव कसे साजरे करायचे?” असा सवाल शेतकऱ्याच्या माध्यमातून बाप्पासमोर मांडण्यात आला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आगरी, कोळी, कराडी व कुणबी या स्थानिक समाजाचे पारंपरिक व्यवसाय, रोजगार आणि संस्कृती धोक्यात आल्याचे यामध्ये अधोरेखित केले आहे.
युवा पिढीला आणि शेतकऱ्यांना आवाहन
“शेतजमीन गेली तर केवळ जमीन जात नाही, तर गाव आणि पुढच्या पिढीचे भविष्यही धोक्यात येते,” असा इशारा देत तरुण पिढीने आपल्या भविष्याचा विचार करून शेती, घरे आणि गावे वाचविण्याच्या लढ्यात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या लढ्यात सहभागी होण्याची सुबुद्धी बाप्पाने सर्वांना द्यावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली आहे.
लढ्यातील मार्गदर्शकांचे स्मरण
या देखाव्यात ऐतिहासिक सेझ (SEZ) आंदोलनातील प्रमुख मार्गदर्शक दिवंगत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, लोकनेते दत्ता पाटील आणि कॉम्रेड विलास सोनावणे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. तसेच ‘तिसरी मुंबई’विरोधातील लढ्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनाही विशेष स्थान दिले आहे. याशिवाय, विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे लावून प्रसिद्धी माध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
एकंदरीत, “जमीन वाचवा, शेती वाचवा, गाव वाचवा आणि पुढच्या पिढीचे भविष्य वाचवा” हा मुख्य संदेश देत या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे.
