• Tue. Sep 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा; ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान टोलमाफी जाहीर

ByEditor

Sep 8, 2026

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनांसह एसटी महामंडळाच्या बसेसना पथकरातून (टोल) पूर्ण सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही टोलमाफी लागू राहणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसीच्या (MSRDC) अखत्यारितील रस्ते, तसेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’ या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

टोल सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘गणेशोत्सव २०२६ – कोकण दर्शन’ नावाचे विशेष पास लावणे अनिवार्य असेल. या पासवर वाहन क्रमांक, चालकाचे नाव, प्रवासाचा मार्ग आणि तारीख नमूद असणार आहे. हे पास संबंधित स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये मोफत उपलब्ध करून दिले जातील. विशेष म्हणजे, हाच पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसनाही संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस किंवा परिवहन विभागामार्फत टोलमाफीचे पास दिले जातील. ऐन सणाच्या तोंडावर मिळालेल्या या टोलमाफीमुळे मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!