• Sun. Aug 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना: बाप्पाची मूर्ती कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, ५ जखमी

ByEditor

Aug 23, 2026

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईतील गिरगाव भुलेश्वर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. ‘अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ (भुलेश्वरचा राजा) च्या आगमन सोहळ्यादरम्यान बाप्पाची विशालकाय मूर्ती कोसळून मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गिरगाव येथील बलराम मर्चंट रोड, कबुतरखाना परिसरातील जय अंबे चौकात ही घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ मंडळाचे यंदा ६३ वे वर्ष असून बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू होती. मंडपापासून अवघ्या ५० ते ६० फुटांवर असताना, क्रेनच्या साहाय्याने आणली जाणारी २२ ते २७ फूट उंच गणेशमूर्ती अचानक तोल गेल्याने थेट खाली कोसळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दुर्घटनेतील जखमींना तातडीने जी. टी. रुग्णालय, रिलायन्स, सैफी आणि जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जी. टी. रुग्णालयात एकाचा, तर रिलायन्स रुग्णालयात दुसऱ्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या सैफी रुग्णालयात एक आणि जे. जे. रुग्णालयात दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच या लोकप्रिय मंडळावर विघ्न आल्याने संपूर्ण भुलेश्वर व गिरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गिरगाव परिसरातील इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांचे प्रस्तावित आगमन सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!