• Mon. Aug 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

७ हजार कोटींच्या ‘मिसिंग लिंक’च्या दर्जावर नितीन गडकरींचे प्रश्नचिन्ह; सरकारला घरचा आहेर

ByEditor

Aug 17, 2026

मुंबई : देशभरात महामार्गांचे जाळे उभारणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या दर्जावर भाष्य करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी, स्वतःच्या कार्यकाळात तयार झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची तुलना महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या ‘मिसिंग लिंक’शी केली.

आपल्या २५-२७ वर्षांच्या अनुभवाचा दाखला देत गडकरी म्हणाले, “पायाभूत सुविधांमध्ये दर्जा आणि ‘क्वालिटी मॉनिटरिंग’ अत्यंत महत्त्वाचे आहे. मी बनवलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आजही एकही खड्डा नाही. मात्र, राज्य सरकारच्या रस्त्यांवर खड्डे पडले तरी लोक त्याचा संबंध माझ्याशीच जोडतात.”

‘मिसिंग लिंक’बाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्या कार्यकाळात वन खात्याची परवानगी न मिळाल्याने हा रस्ता तयार करता आला नव्हता. पुढे महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण केला; परंतु तिथे दरड कोसळल्याच्या आणि रस्ता खराब झाल्याच्या बातम्या आल्या. याप्रकरणी सोशल मीडियावर मलाच टार्गेट करण्यात आले. मात्र, सोशल मीडियामुळे दर्जा नियंत्रणात (Quality Control) सुलभता आली असून कुठे गडबड झाली आहे हे लगेच लक्षात येते.”

खोपोली एक्झिट ते कुसगाव (लोणावळा) दरम्यानचा १३.३ किमी लांबीचा हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प तब्बल ७,००० कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) उभारला आहे. १ मे २०२६ रोजी या मार्गाचे उद्घाटन झाले असून, या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणे वगळून प्रवासाचा अर्धा तास वाचत आहे.

६ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळल्याने हा मार्ग तब्बल १८ तास बंद ठेवावा लागला होता. तसेच बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ खड्डे पडल्याचेही निदर्शनास आले होते. एमएसआरडीसीने दरड कोसळण्याची घटना ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगत संरचनेला (Structural Design) कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता.

मात्र, आता थेट केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनीच या कामाच्या गुणवत्तेवर आणि ‘क्वालिटी मॉनिटरिंग’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ‘मिसिंग लिंक’च्या बांधकामाचा दर्जा आणि राज्य सरकारचा दावा, दोन्ही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!