• Mon. Aug 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

इंडो अमाईन्स कंपनीतील मृत कल्पेश वांद्रे याच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; पत्नीला दरमहा ११ हजारांची पेन्शन

ByEditor

Aug 17, 2026

महाड । मिलिंद माने
महाड औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) ‘इंडो अमाईन्स’ रासायनिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळती प्रकरणी कल्पेश वांद्रे या स्थानिक कामगाराच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर कंपनी व्यवस्थापनाने वांद्रे कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत, मृत कामगाराच्या पत्नीला दरमहा ११ हजार रुपये पेन्शन आणि मुलांच्या भवितव्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.

शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास इंडो अमाईन्स कंपनीत ‘ट्रायफॉसजीन’ या अत्यंत विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत बिहार येथील परप्रांतीय कामगार अमित कुमार याचा जागीच मृत्यू झाला, तर बोरगाव येथील स्थानिक रहिवासी कल्पेश वांद्रे यांचा श्वास गुदमरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. अमित कुमार यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आला आहे.

दरम्यान, स्थानिक भूमिपुत्र कल्पेश वांद्रे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच बोरगाव ग्रामस्थ व नातेवाईक अत्यंत संतप्त झाले. जोपर्यंत वांद्रे कुटुंबीयांना योग्य मदत आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला गराडा घातला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापन आणि ग्रामस्थांमध्ये तातडीची बैठक पार पडली. या चर्चेअंती कंपनी प्रशासनाने कल्पेश वांद्रे यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची सानुग्रह मदत, पत्नीस दरमहा ११ हजार रुपये पेन्शन आणि मुलांच्या शिक्षणाचा व भवितव्याचा विचार करण्याचे मान्य केले. या निर्णयावर समाधान व्यक्त करत ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!