मुंबई : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे.
दीड वर्षांच्या राजकीय ओढाताणीला पूर्णविराम
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू होती. आदिती तटकरे यांच्याकडेच पालकमंत्रिपद कायम राहावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती. भरत गोगावले आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हे पद शिवसेनेलाच मिळायला हवे, यावर ठाम होते. या परस्परविरोधी भूमिकांमुळे तब्बल दीड वर्ष रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय प्रलंबित राहिला होता.
विधान परिषद निवडणुकीदरम्यान पडद्यामागे घडामोडी
हा वाद केवळ एका पदापुरता नसून जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील वादामुळे ही कोंडी अधिक जटिल बनली होती. मात्र, सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान वरिष्ठ पातळीवर यावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयासाठी शिवसेनेने सहकार्य करावे आणि त्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला दिले जावे, असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
गोगावले विरुद्ध तटकरे वाद संपला
भरत गोगावले यांनी यापूर्वी अनेकदा या विलंबाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान मिळूनही अधिकृत घोषणा न झाल्याने त्यांनी “कुठल्या देवाची नड आहे?” असा सवाल केला होता.
दुसरीकडे, आदिती तटकरे यांनी “भरत गोगावले पालकमंत्री झाले तर माझ्या त्यांना शुभेच्छाच असतील,” अशी मवाळ भूमिका घेतली होती, तर शिवसेनेचे आमदार “भरतशेठ ठरले आहेत, आता फक्त जॅकेट घालायचे बाकी आहे,” अशी टिपणी करत होते. अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा तिढा सोडवत भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
