कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप
चुकीच्या माहितीमुळे उपचारास विलंब; जबाबदार अधिकाऱ्यांची अनुपस्थिती उघड
दोषींवर २४ तासांत कठोर कारवाई करण्याचे पोलिसांचे आश्वासन; कंपनी बंद करण्याची स्थानिकांची मागणी
महाड । मिलिंद माने
महाड औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) ‘इंडो अमाईन्स’ (बी-१४) या रासायनिक कंपनीत शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास झालेल्या भीषण वायू गळतीत दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर ३६ हून अधिक कामगारांना विषबाधा झाली आहे. दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे आणि कंपनीने वायू संदर्भात चुकीची माहिती दिल्याने उपचारास विलंब झाल्याचे उघडकीस आले असून, या निष्काळजीपणामुळे स्थानिक ग्रामस्थ व कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या अपघातात अमित कुमार (वय २८, रा. बिहार) आणि कल्पेश वांद्रे (रा. बोरगाव) या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य एका कामगाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
‘ट्रायफॉसजीन’ वायूने उडवली धांदल; उपचारांत झाला विलंब
शनिवारी दुपारच्या शिफ्टमध्ये कंपनीत २६ कामगार कार्यरत होते. उत्पादन सुरू असताना अचानक प्राणघातक वायूची गळती झाली आणि हा वायू हवेत पसरला. त्यामुळे इंडो अमाईन्ससह समोरील ‘विरल’ आणि ‘विनंती ऑरगॅनिक’ कंपनीतील सुमारे ३६ कामगारांना विषबाधा झाली.
दुर्घटनेनंतर सुरुवातीला कंपनी प्रशासनाने हायड्रोक्लोरिक ॲसिड (HCL) वायूची गळती झाल्याची माहिती दिली. त्यानुसार डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले; मात्र रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अधिक चौकशी केली असता, तो HCL नसून अत्यंत विषारी ‘ट्रायफॉसजीन’ वायू असल्याचे निष्पन्न झाले. चुकीच्या माहितीमुळे योग्य उपचारांना विलंब झाला आणि दोन कामगारांना प्राण गमवावे लागले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विषबाधा झालेल्या इतर ३६ कामगारांवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार करून रविवारी सकाळी त्यांना घरी सोडण्यात आले.
कंपनी बंद करण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी कंपनीकडे धाव घेतली; मात्र तेथे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. अखेर शेजारील कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी येऊन आपत्कालीन उपाययोजना राबवल्या.
महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत बुवा जाधव आणि पंचायत समिती सदस्य मयूर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. “या कंपनीत यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. आजवरच्या दुर्घटनावेशी पाहता येथे अनुभवी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. यामुळे शेजारील आसनपोई गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ही कंपनी शासनाने त्वरित बंद करावी,” अशी आक्रमक मागणी चंद्रकांत जाधव यांनी केली.
तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; पोलिसांकडून चौकशी सुरू

या दुर्घटनेमुळे फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि लेबर ऑफिसर यांच्याकडून नियमित केल्या जाणाऱ्या सुरक्षितता तपासण्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर रविवारी सकाळपर्यंत पोलीस प्रशासनाकडे याबाबत कोणतीही अधिकृत प्राथमिक माहिती उपलब्ध नव्हती.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रभारी डीवायएसपी शशिकांत पवार आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “सदर प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल पुढील २४ तासांत प्राप्त होईल. कंपनी व्यवस्थापनाने चुकीची माहिती दिल्याचे सिद्ध झाल्यास आणि सुरक्षेतील त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलीस निरीक्षक रावडे यांनी स्पष्ट केले.
