माणगाव । सलीम शेख
पुणे–मालेगाव ते पुणे–रायगड जिल्हा हद्द आणि पुढे माणगावकडे जाणाऱ्या ‘राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३एफ’च्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी बंद असलेला मार्ग आता मर्यादित स्वरूपात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गावरून केवळ हलकी मोटार वाहने आणि शासकीय प्रवासी वाहनांना ताशी २० किलोमीटरच्या वेगमर्यादेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
रस्त्याच्या कामामुळे यापूर्वी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) कार्यकारी अभियंता, महसूल व पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी (मावळ-मुळशी) तसेच संबंधित ठेकेदारांनी ८ ऑगस्ट रोजी या महामार्गाची संयुक्त पाहणी केली. पाहणी अहवाल व शिफारशींचा सकारात्मक विचार करून प्रशासनाने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. हा आदेश ‘मोटार वाहन कायदा १९८८’ मधील कलम ११५ अंतर्गत देण्यात आला आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे. केवळ हलक्या व शासकीय प्रवासी वाहनांनाच मुभा देण्यात आली असून, वाहनचालकांनी ताशी २० किमीची वेगमर्यादा पाळणे आणि काम सुरू असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेणे अनिवार्य आहे.
पुण्यातून रायगड तसेच माणगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, पर्यायी मार्गामुळे होणारा फेरफटका आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे. महामार्गाचे काम सुरक्षितपणे आणि वेगाने पूर्ण व्हावे यासाठी नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
