• Fri. Aug 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची मोठी कारवाई; ८० हजार किमतीचे सागवानी लाकूड जप्त!

ByEditor

Aug 14, 2026

महाड । मिलिंद माने
महाड तालुक्यातील किंजळोली गावाच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या जागेत बेकायदेशीरपणे तोड करून लपवून ठेवलेले सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड महाड वनविभागाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून जप्त केले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मौजे किंजळोली परिसरात विनापरवाना सागवान वृक्षांची तोड करून लाकूड लपवल्याची तक्रार एका नागरिकाने वनविभागाकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पाहणीदरम्यान तक्रारीपेक्षाही अधिक, म्हणजेच सुमारे चार घनमीटर बेकायदेशीर सागवानी लाकूड आढळून आले, जे वनविभागाने तात्काळ जप्त केले.

जप्त केलेले सागवानी लाकूड माणगाव तालुक्यातील नाणोरे येथील वनखात्याच्या शासकीय विक्री आगारात (डेपो) रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी वृक्षतोड करणाऱ्या संबंधित व्यक्तीला नोटीस बजावण्यात आली असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी दिली.

ही यशस्वी कारवाई महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपाल संदीप उतेकर (महाड), आदेश जाधव (दापोली), सुनील घोलप (रायगड) तसेच वनरक्षक भोसले (नाते), दिलीप जंगम (करंजाळी), मोरे आणि तिरके (रायगड) यांच्या पथकाने केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!