उरण । घनःश्याम कडू
उरण नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळण्याचा गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वारसाहक्क योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांना सफाई कर्मचारी पदावर नियुक्ती देण्यात आली असून, त्यांनी उरण नगरपरिषदेत अधिकृतपणे रुजू होत आपल्या सेवेला सुरुवात केली आहे. यामुळे संबंधित १९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरपरिषद सभागृहात नगरसेवक गणेश शिंदे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि मंगेश कासारे यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता. विशेषतः नगरसेविका प्रमिला पवार यांनी आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह सभागृहात ही बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. या मांडणीची दखल घेत नगराध्यक्षा सौ. भावनाताई घाणेकर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
दिलेल्या आश्वासनानुसार, नगराध्यक्षा घाणेकर यांनी नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कायदेशीर अडचणी दूर करण्याची मागणी केली. त्यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने चक्रे फिरली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १९ वारसांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
सेवेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नगरपरिषदेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हाताला रोजगार मिळाल्याने नवनियुक्त कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. ही नियुक्ती केवळ रोजगाराची संधी नसून संबंधित कुटुंबांसाठी स्थैर्य, स्वाभिमान आणि नव्या आशेची सुरुवात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या न्यायालयीन व प्रशासकीय लढ्यात सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर व सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. ज्यांच्या कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे उरण शहराची स्वच्छता राखली, त्यांच्या वारसांना अखेर न्याय मिळाला आहे. या नवीन कर्मचाऱ्यांच्या समावेशामुळे उरण नगरपरिषदेची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करत, सर्वांनी “सेवा हीच खरी ओळख, स्वच्छता हीच खरी संस्कृती” या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
