उरण । अनंत नारंगीकर
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात दीर्घकाळ कार्यरत असलेले उरण तालुक्यातील कोप्रोली येथील सुपुत्र पवन प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी जयश्री पवन म्हात्रे (ठाकूर) यांची एकाच वेळी ‘अवर सचिव’ (Under Secretary – Class I / गट-अ) या महत्त्वाच्या राजपत्रित अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने प्रशासकीय सेवेत प्राप्त केलेल्या या उत्तुंग यशामुळे उरण आणि अलिबाग परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विधानमंडळ सचिवालयात गेल्या २५ वर्षांपासून विविध पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या या दाम्पत्याने आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर ही पदोन्नती मिळवली आहे. पवन म्हात्रे (B.Com, LL.B, LL.M) हे उरण तालुक्यातील कोप्रोली (चिरनेर) येथील स्वर्गीय प्रकाश गजानन म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांच्या पत्नी सौ. जयश्री म्हात्रे (BA, LL.B) या अलिबाग तालुक्यातील कुसुमळे गावची कन्या आहेत.
शासकीय प्रशासनात ‘अवर सचिव’ हे अत्यंत जबाबदारीचे आणि महत्त्वाचे पद मानले जाते. उपसचिव आणि कक्ष अधिकारी यांच्यातील दुवा म्हणून धोरणांची अंमलबजावणी, फायलींची छाननी आणि प्रशासकीय कामकाजात या पदाची भूमिका निर्णायक असते. अशा उच्च पदावर एकाच वेळी दोन्ही पती-पत्नींची वर्णी लागल्याने कोप्रोली ग्रामस्थ, मित्रमंडळ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
