• Tue. Aug 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तब्बल ९८ लाखांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; ३० लाख रुपयांच्या बदल्यात १ कोटींचा भाव

ByEditor

Aug 11, 2026

पालघर | विशेष प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील वसई येथे बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल १९ हजार ५८२ बनावट नोटा जप्त केल्या असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची एकूण दर्शनी किंमत ९७ लाख ८१ हजार रुपये इतकी आहे.

३० लाखांत १ कोटींचा सौदा!

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी जवळपास एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा केवळ ३० लाख रुपयांच्या अस्सल चलनामध्ये विकण्याच्या तयारीत होता. या व्यवहाराचा भाव आधीच ठरला होता; मात्र प्रत्यक्ष विक्रीपूर्वीच पोलिसांनी कारवाई करून हा डाव उधळून लावला.

शिरसाड फाटा परिसरात सापळा रचून कारवाई

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील शिरसाड फाटा आणि मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशिदकोपर परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा (कक्ष-२) च्या पथकाने सापळा रचून प्रदीप आत्माराम पाटील (वय ५१) याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले.

आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या बनावट नोटांची छपाई कुठे करण्यात आली, नोटा छापण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आधुनिक मशिन्सचा वापर झाला, या रॅकेटमध्ये सहभागी असणारे इतर दोन साथीदार कोण आहेत, या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय बनावट चलन टोळीशी जोडलेले आहेत का? या सर्व मुद्द्यांवर वसई गुन्हे शाखा अधिक तपास करत असून लवकरच यातील इतर सूत्रधारांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!