• Fri. Sep 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिरनेर जंगल सत्याग्रह : ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला भूमिपुत्रांचा एल्गार!

ByEditor

Sep 25, 2026

उरण । घन:श्याम कडू
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध देशभर स्वातंत्र्याची लढाई पेटलेली असताना उरणच्या भूमीतही अन्यायाविरुद्धचा एल्गार उसळला. २५ सप्टेंबर १९३० रोजी अक्कादेवीच्या माळरानावर झालेला चिरनेर जंगल सत्याग्रह हा ब्रिटिशांच्या अन्यायकारक वनकायद्याला भूमिपुत्रांनी दिलेला निर्भीड प्रतिकार होता. आपल्या पारंपरिक वनहक्कांवर घातलेल्या निर्बंधांविरोधात शेतकरी, आदिवासी, कातकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या सत्याग्रहात सहभागी झाले.

ब्रिटिश सत्तेने जंगलांवर नियंत्रण मिळवत स्थानिकांच्या पारंपरिक हक्कांवर निर्बंध आणले होते. जंगलातील लाकूड, सरपण आणि इतर साधनसंपत्तीच्या वापरावर बंधने लादण्यात आली. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये असंतोष वाढत होता. महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग आंदोलनाची देशभर धग पेटलेली असतानाच या अन्यायकारक वनकायद्याविरुद्ध चिरनेर परिसरातील जनतेनेही रणशिंग फुंकले.

चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, खोपटे, पांडिवे, मोठी जुई, धाकटी जुई, दिघोडे, भोम, विंधणे आदी परिसरातून नागरिक अक्कादेवीच्या माळरानावर जमले. हातात काठ्या, कुऱ्हाडी, विळे आणि पारंपरिक साधने घेऊन सत्याग्रहींनी ब्रिटिशांच्या वनकायद्याला उघडपणे आव्हान दिले.

आंदोलनाचा वाढता जनसैलाब पाहून ब्रिटिश प्रशासनाने दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. परिस्थिती चिघळली आणि अखेर सत्याग्रहींवर गोळीबार करण्यात आला. बंदुकीच्या गोळ्यांसमोर निःशस्त्र भूमिपुत्र उभे राहिले; अक्कादेवीच्या माळरानावर रक्त सांडले, अनेकजण जखमी झाले आणि उरण तालुक्यातील आठ वीरांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली.

या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई) आणि आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने चिरनेरच्या मातीत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास रक्ताने लिहिला गेला.

हा संघर्ष केवळ वनकायद्याविरोधातील आंदोलन नव्हता. तो ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध सामान्य जनतेने उभारलेला स्वाभिमानाचा लढा होता. जंगल हे आपल्या जगण्याचा आधार आहे आणि त्यावर स्थानिकांचा पारंपरिक अधिकार आहे, या भूमिकेतून नागरिकांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले.

रक्त सांडले; पण लढ्याची मशाल विझली नाही!

ब्रिटिश प्रशासनाला आंदोलन बंदुकीच्या जोरावर चिरडता आले; मात्र भूमिपुत्रांच्या मनातील स्वातंत्र्याची ज्वाला विझवता आली नाही. अक्कादेवीच्या माळरानावर सांडलेल्या रक्ताने चिरनेरच्या संघर्षाला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिले.

आज स्वातंत्र्य मिळून दशके उलटली असली तरी चिरनेर जंगल सत्याग्रहाची आठवण केवळ स्मृतिदिनापुरती मर्यादित राहता कामा नये. ज्या भूमिपुत्रांनी अन्यायकारक कायद्याविरुद्ध आवाज उठवला, ब्रिटिशांच्या गोळ्यांना छातीवर झेलले आणि स्वातंत्र्यासाठी प्राण दिले, त्यांच्या बलिदानाची गाथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली ठरेल.

चिरनेर जंगल सत्याग्रहाने एक गोष्ट इतिहासाच्या पानांवर ठामपणे कोरली, सत्ता बंदुकीच्या जोरावर राज्य करू शकते; पण जनतेचा हक्क, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जिद्द गोळ्यांनी कधीच संपवता येत नाही!

आज 25 सप्टेंबर 2026 चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!