मुंबई : ऐन सणासुदीच्या काळातच सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. गेल्या एका महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ६.६ टक्क्यांची वाढ झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर जवळपास ९ टक्क्यांनी महागले आहेत. गेल्या महिन्यात बाजारात साखरेची सरासरी किंमत प्रति किलो ४७.१७ रुपये होती, ती आता वाढून थेट ५०.३० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. पुढे गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळी यांसारखे मोठे सण असल्याने साखरेला बाजारात मोठी मागणी असते. मात्र, सण-उत्सवांच्या तोंडावरच दर भडकल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत असून गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सणांच्या काळात मागणी वाढणार हे गृहीत धरून साखरेच्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आणि डीलर्सनी कृत्रिम साठेबाजी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे बाजारातील पुरवठा घटला आणि मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडल्याने साखरेच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाली.
दरम्यान, साखरेच्या वाढत्या किमतींवर आळा घालण्यासाठी आणि वितरण साखळी सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर साखरेचा साठा करण्यासंदर्भात विशिष्ट मर्यादा (स्टॉक लिमिट) लागू करण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी या साठा मर्यादा लागू राहतील, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बाजारात साखरेचा तुटवडा भासू नये, साठेबाजीला चाप बसावा आणि सणांच्या दिवसांत साखरेचे दर स्थिर राहावेत, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या या हस्तक्षेपामुळे साठेबाजांवर वचक बसून साखरेचे दर पुन्हा नियंत्रणात येतील आणि सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
