अलिबाग : महावितरणकडून बसवण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’विरोधात आता शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आक्रमक झाला असून, रायगड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे येणारी वाढीव वीजबिलं, टेंडर प्रक्रियेतील संशय आणि नागरिकांची होणारी गैरसोय या मुद्द्यांवरून शेकापने सरकार आणि महावितरणविरोधात एल्गार पुकारला आहे.
शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्यभरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर नाहक आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट मीटर खरेदी व निविदा (टेंडर) प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत, सरकारने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा अशी ठाम भूमिका शेकापने घेतली आहे.
या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाधित वीज ग्राहकांना संघटित करून व्यापक जनआंदोलन उभारले जात आहे. गणेशोत्सवाचा सण पार पडताच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे महावितरण व प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
स्मार्ट मीटरचा मुद्दा आता राजकीय व सामाजिकदृष्ट्या अधिक तापण्याची चिन्हे असून, गणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये निघणाऱ्या या धडक मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
