• Tue. Sep 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणचा विमला तलाव बनलाय ज्येष्ठांचा ‘एनर्जी पॉईंट’; मोबाईलमध्ये गुरफटलेल्या तरुणाईसमोर ठेवला आदर्श

ByEditor

Sep 8, 2026

उरण । घनःश्याम कडू
हातात मोबाईल, कानात इअरफोन आणि तासन् तास स्क्रीनवर खिळलेले डोळे… आजच्या तरुणाईचे हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, उरण येथील विमला तलावावर जमणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र ‘वय झाले म्हणून काय झाले?’ असे म्हणत तरुणाईलाच आरसा दाखवला आहे. ‘मॉर्निंग कट्टा विमला तलाव’च्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या ५० ते ८० वयोगटातील ज्येष्ठांनी नुकताच दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत, आपली ऊर्जा आणि जिंदादिली सिद्ध केली आहे.

उरण शहरातील विमला तलाव परिसर गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत सुमारे ८० हून अधिक नागरिक येथे नियमित एकत्र येतात. केवळ गप्पा मारण्यापुरता मर्यादित न राहता येथे नियमित व्यायाम, योगासने, भावगीते, वाढदिवस आणि सर्व धर्मीय सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आरोग्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत या कट्ट्याच्या माध्यमातून एका गरजू महिलेला दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदतही केली जाते.

या कट्ट्यामुळे ज्येष्ठांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन आरोग्य जपण्यास मोठी मदत होत आहे. दरम्यान, पावसाळ्यात उघड्यावर उभे राहण्याची अडचण लक्षात घेऊन माजी आमदार मनोहरशेठ भोईर आणि नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या माध्यमातून येथे तात्पुरती ताडपत्रीची शेड उभारून देण्यात आली आहे. या सुविधेबद्दल सर्व सदस्यांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

आभासी दुनियेत अडकलेल्या आजच्या तरुण पिढीने मोबाईलची स्क्रीन बाजूला ठेवून मोकळ्या हवेत यावे, शरीराला घाम गाळावा आणि माणसांमध्ये मिसळावे, असाच संदेश विमला तलावावरील या ‘एनर्जी पॉईंट’वरून मिळताना दिसत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!