उरण । घनश्याम कडू
घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत तब्बल ९ लाख ७७ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवणाऱ्या सराईत घरफोड्याला उरण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तब्बल २६ दिवस मागोवा घेत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ या चोरट्याला ताब्यात घेतले. अनिल लक्ष्मण नाईक (वय ४४, रा. गिरवले, पनवेल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ९ लाख ६४ हजार ३०० रुपयांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवरे (ता. उरण) येथील एका घरात १७ जुलै रोजी दुपारी अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकीतून आत शिरून रोकड व दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी १८ जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सोलापूर ते कोल्हापूर… २६ दिवसांचा पाठलाग
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताची ओळख पटली. मात्र, आरोपी सराईत असल्याने तो पोलिसांना चकवा देण्यासाठी सोलापूर, अक्कलकोट, चाकण, आदमापूर आणि कोल्हापूर येथील डॉर्मेटरी व लॉजमध्ये राहून सतत ठिकाणे बदलत होता. ३१ ऑगस्ट रोजी आरोपी कोल्हापूरहून पनवेलच्या दिशेने येत असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून खालापूर टोलनाक्यावर त्याला जेरबंद केले.
सराईत गुन्हेगार; ६ गुन्हे दाखल
पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता आरोपी अनिल नाईक याने आवरे येथील घरफोडीची कबुली दिली. आरोपीवर नवी मुंबई आणि रायगड परिसरात यापूर्वी घरफोडी व जबरी चोरीचे ६ गुन्हे दाखल आहेत.
ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर, पोलीस निरीक्षक राहुल काटवानी, पीएसआय गोविंद केंद्रे, अंमलदार जयंत घरत, किशोर फंड, अनिल मानकर, रियाज शेख आणि बसवराज सकपाळ यांच्या पथकाने केली.
