नगरपालिका हद्दीतील जोडरस्ता मात्र अद्याप अपूर्णच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
उरण (घनःश्याम कडू) उरणकरांना प्रदीर्घ काळापासून भेडसावणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येतून अखेर सुटका मिळाली आहे. गेल्या १८ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्ष आणि सततच्या पाठपुराव्यानंतर उरण शहराबाहेरून जाणारा नवीन बायपास उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे दिमाखदार उद्घाटन होणार असून यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, या बायपासला उरण-मोरा रस्त्याशी जोडणारा नगरपालिका हद्दीतील रस्ता अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे बायपास सुरू होत असला, तरी उरण शहराच्या पूर्ण वाहतूक सुटसुटीतपणाला अजूनही अडसर कायम आहे. उर्वरित रस्त्याचे काम प्रशासनाने तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.गोपाळ पाटलांच्या संघर्षाची फलश्रुती
उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने लढा दिला. २००८ मध्ये त्यांनी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय नकुल पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून या बायपासची मागणी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर २०१० मध्ये सिडकोने २८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली; परंतु काम रखडल्याने २०१६ मध्ये त्यांनी पुन्हा तीव्र आंदोलन उभारले. यापूर्वी खोपटे पुलासाठी पाऊलवाट तयार करण्यापासून ते माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या सहकार्याने खोपटे पूल साकारण्यापर्यंत, तसेच करळ रेल्वे क्रॉसिंगच्या प्रश्नावर उड्डाणपूल उभारण्यापर्यंत गोपाळ पाटील यांनी सातत्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून लढा दिला आहे. या मालिकेतील उरण बायपास हे त्यांच्या संघर्षाचे पुढील यश मानले जात आहे.अपूर्ण जोडरस्त्यावरून प्रशासनावर टीका
बायपास खुला होत असला तरी नगरपालिका हद्दीतील जोडरस्ता अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजीही व्यक्त होत आहे. "बायपास सुरू झाला हा आनंदाचा क्षण आहे, परंतु नगरपालिका प्रशासनाने आता तरी झोपेचे सोंग सोडून उर्वरित रस्ता तात्काळ पूर्ण करावा," अशी आग्रही अपेक्षा उरणकरांकडून व्यक्त केली जात आहे.