सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून रायगड जिल्हा बँकेच्या कार्याचे कौतुक

पेण येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित बँकिंग सुविधा, आर्थिक साक्षरता आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील कार्यक्रमात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
मुख्य संपादक
रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ | संध्याकाळी ६:०९ ● ३३५ वाचन (Views)
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून रायगड जिल्हा बँकेच्या कार्याचे कौतुक
जाहिरात (Advertisement)

ग्राहक सेवा आणि शासकीय योजनेमध्ये आदर्श निर्माण केल्याचा गौरव

अलिबाग (सचिन पावशे)

पेण येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित बँकिंग सुविधा, आर्थिक साक्षरता आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील कार्यक्रमात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे मुंबई येथील प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव आणि उपमहाव्यवस्थापक डॉ. ज्योती सक्सेना यांनी रायगड जिल्ह्यातील बँकिंग सेवांचा आढावा घेताना जिल्हा बँकेच्या कार्याची दखल घेतली.

कार्यक्रमातील वक्त्यांनी रायगड जिल्ह्यात बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे, बँकिंग सेवांचा अधिकाधिक प्रसार करणे आणि विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी बँकिंग क्षेत्रात राबवत असलेल्या विविध योजना आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांची दखल घेण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या उपमहाव्यवस्थापक डॉ. ज्योती सक्सेना यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. रायगड जिल्हा बँक ग्राहक सेवा आणि नियमांचे पालन याकडे केवळ व्यावसायिक जबाबदारी म्हणून न पाहता सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काम करते, हा दृष्टिकोन इतर बँकांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याची बँकेची भूमिका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, रायगड जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठ्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले महत्त्वाचे स्थान कायम राखत असल्याचा विशेष उल्लेख रिझर्व्ह बँकेचे संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी केला. कृषी क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी बँकेच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समितीचे निमंत्रक विवेक नाचणे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक धनंजय सिंह राठौर, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक बिचेंद्र चरण मल्लिक आणि बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांच्यासह विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध सरकारी, खासगी आणि सहकारी बँकांचे प्रतिनिधी, प्रादेशिक प्रमुख तसेच विविध बँकांचे ग्राहक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक यांसह जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे अधिकारी आणि प्रतिनिधीही उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समितीचे निमंत्रक विवेक नाचणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्यासह विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी उद्घाटनपर भाषण केले. रायगड जिल्हा बँकेच्या सुनिता पाटील या सह अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांच्या धनादेश वितरणाचाही कार्यक्रमात समावेश होता.

रिझर्व्ह बँकेच्या व्यासपीठावरून झालेल्या या कौतुकामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाभिमुख कार्याची, कृषी कर्जपुरवठ्यातील योगदानाची आणि सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. या गौरवाबद्दल बँकेचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

नागोठणे येथे ‘ए सेवेन स्टुडिओ’चा भव्य शुभारंभ!

महिलांच्या फॅशनविश्वात नवनवीन ट्रेंड्स, आकर्षक डिझाइन्स आणि दर्जेदार कपड्यांची मेजवानी घेऊन ‘ए सेवेन स्टुडिओ – Exclusive For Women’ या महिलांसाठीच्या विशेष फॅशन स्टुडिओचा भव्य शुभारंभ नागोठणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पुई हद्दीत टाटा कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुई गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी व भीषण अपघात घडला.

उरणमध्ये तरुणाला पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अवघ्या २४ तासांत दोघांना अटक

जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना उरण-चिरनेर परिसरात घडली. या गंभीर गुन्ह्याची तातडीने दखल घेत उरण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.