कोलाड (विश्वास निकम)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुई गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी व भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा कारने एका सायकलस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात सायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रविंद्र विठ्ठल मांजरे (वय ४८, रा. गोवे, ता. रोहा, जि. रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास रामचंद्र जाधव हे आपल्या मोटरसायकलवरून मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जात होते. त्याच वेळी त्यांच्या पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूने रविंद्र मांजरे हे आपल्या सायकलवरून कोलाडवरून गोवे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, कोलाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणारी टाटा कार (क्र. MH 01 ER 8017) हीचा चालक गिरीष मोहन जाधव (वय ५०, रा. काळाचौकी, मुंबई) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, कार अतिवेगाने व हयगयीने चालवून सायकलस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रविंद्र मांजरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (कॉ. गु. रजि. नं. १४४/२०२६) अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) बी. बी. फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (पोसई) एस. जी. भोजकर या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पुई हद्दीत टाटा कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू