'नऊ दिवस नऊ थीम' संकल्पना ठरली पंचक्रोशीत आकर्षणाचा केंद्रबिंदू
रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील गावठण येथे भवानी माता नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यात्माचा मोठा वारसा लाभलेल्या गावठण गावात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत ग्रंथवाचन, हरिपाठ आणि कीर्तन यांसारख्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्यात आले होते.गावठण येथील शिवमुद्रा मित्र मंडळ हे शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात मंडळाने राबवलेली ‘नऊ दिवस नऊ थीम’ ही विशेष संकल्पना सर्वत्र चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली. सध्याच्या काळात अनेक ठिकाणी दांडिया व गरबा खेळ कमी होत असताना, शिवमुद्रा मित्र मंडळाने या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील तरुण-तरुणींना एकत्र आणून पारंपरिक संस्कृती जपण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
या संपूर्ण उत्सवाचे नेटके आणि अचूक नियोजन मंडळाचे अध्यक्ष भावेश सानप, उपाध्यक्ष कैलास कदम, सेक्रेटरी सागर सानप, उपसेक्रेटरी ओंकार कदम, खजिनदार जयेश बामुगडे, उपखजिनदार सूरज कदम, सल्लागार ज्ञानेश्वर सानप व विजय कदम तसेच सदस्य अभिषेक सानप, अक्षय सानप आणि विक्रांत कदम यांनी केले.
या महोत्सवाला गावातील महिला, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा नवरात्र उत्सव अतिशय दिमाखदार आणि उत्साही वातावरणात पार पडला.