मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे उद्या, बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दक्षिण रायगड आणि चिपळूण परिसराच्या विशेष दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महामार्गावरील रस्त्यांची पाहणी, बायपास कामांचा आढावा तसेच लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्राला (MIDC) भेट देऊन पाहणी करणार आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार, आदित्य ठाकरे सकाळी १० वाजता मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानावरून रायगडकडे रवाना होतील. त्यानंतर सकाळी ११:४५ वाजता डोलव्ह येथे व दुपारी १२:५० वाजता नागोठणे येथे पोहोचून ते रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करतील. दुपारी २:५० वाजता माणगाव बायपासच्या कामांची पाहणी केल्यानंतर, सायंकाळी ४ वाजता ते लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्राला भेट देऊन तेथील पाहणी करतील. यानंतर लोटे येथेच पक्षीय बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, हा दौरा पूर्ण करून संध्याकाळी ते मुंबईसाठी परत रवाना होतील.
आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे महामार्ग व स्थानिक रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड आणि चिपळूण परिसरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
