• Tue. Aug 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन-दांडा स्मशानभूमीत पुन्हा अघोरी प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ByEditor

Aug 25, 2026

श्रीवर्धन। अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील दांडा परिसरातील स्मशानभूमीत पुन्हा एकदा अघोरी विद्येशी संबंधित असल्याचा संशय निर्माण करणारा प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमी परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्मशानभूमीमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याची चर्चा परिसरात होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. नेमका हा प्रकार अघोरी विद्येशी संबंधित आहे की कोणीतरी गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने या वस्तू तेथे ठेवलेल्या आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे अशा घटना घडत असल्यास त्यामागील व्यक्तींचा शोध घेणे आणि परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे स्मशानभूमी परिसरात नियमित गस्त वाढवावी तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या घटनेची प्रशासन व पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी आणि आढळून आलेल्या संशयास्पद वस्तूंची तपासणी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अफवांना बळी न पडता या प्रकारामागील नेमके कारण शोधून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!