• Mon. Aug 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘आदर्श पतसंस्था’ आता ‘सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.’

ByEditor

Aug 24, 2026

वार्षिक सभेत नाव बदलाचा ठराव मंजूर; पुढील दोन वर्षांत २५०० कोटींचे उद्दिष्ट

अलिबाग: येथील ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’च्या नावात बदल करून ‘सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड’ असे नवीन नाव देण्याचा ठराव संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. पी. एन. पी. नाट्यगृह, चेंढरे येथे आयोजित ही सभा संस्थेचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

संचालक अ‍ॅड. आत्माराम काटकर यांनी नाव बदलाचा ठराव मांडला, ज्याला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. यासोबतच माणगाव (जि. रायगड) आणि वारजे (पुणे) येथील नियोजित शाखांसाठी जागा खरेदी करण्याचा ठरातही सभेत मंजूर करण्यात आला.

आर्थिक स्थिती आणि भविष्यातील उद्दिष्टे

अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, संस्थेचे सध्या ५८,८८६ सभासद असून ५९६ कोटी ८८ लाख रुपयांच्या ठेवी व ४६० कोटी ७३ लाख रुपयांचे कर्जवाटप आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय १,०५७ कोटी ६१ लाख रुपये झाला असून ढोबळ नफा १५ कोटी ४१ लाख रुपये झाला आहे. गेल्या वर्षात ठेवींमध्ये ३७% तर कर्जात ४५% वाढ झाली आहे. मागील एका वर्षात ३०४ कोटींची विक्रमी व्यवसाय वाढ नोंदवणारी आदर्श ही राज्यातील पहिली संस्था ठरली आहे.

संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पुढील वाटचालीची माहिती देताना, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात १,५०० कोटी आणि पुढील दोन वर्षांत २,५०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.

विशेष सन्मान व सत्कार

सभेच्या सुरुवातीला देशसेवेत शहीद झालेले जवान सुयोग अशोक कांबळे (रा. नारंगी) यांच्या वीरपत्नी निशा सुयोग कांबळे यांना ५१,००० रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. हवाई दलात लढाऊ विमान वैमानिक म्हणून निवड झालेल्या कौस्तुभ मेहुल पाटील याच्या वतीने त्याचे वडील मेहुल पाटील यांनी सत्कार स्वीकारला. याव्यतिरिक्त शास्त्रज्ञ प्रदीप ताम्हाणे, तसेच बँकिंग व एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत कर्मचाऱ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

सभेपूर्वी सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिर पार पडले, ज्यामध्ये बँकिंग तज्ञ नितीन वाणी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी संस्थेच्या तंत्रज्ञानस्नेही वाटचालीचे कौतुक केले.

या सभेस संस्थेचे उपाध्यक्ष कैलास जगे, कार्यलक्षी संचालिका मीनाक्षी पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पाटील यांनी केले, तर डॉ. मकरंद आठवले यांनी आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!