• Fri. Aug 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खासदार सुनील तटकरेंच्या दौऱ्यामुळे करंजा जेट्टी चकाचक; मच्छीमारांच्या डिझेल दराचा प्रश्न सुटणार का?

ByEditor

Aug 21, 2026

उरण । घनःश्याम कडू
रायगडचे खासदार तथा केंद्र सरकारच्या पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच करंजा येथील ओएनजीसी (ONGC) प्रकल्पाला भेट दिली. या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या विळख्यात अडकलेली करंजा जेट्टी प्रशासनाने तातडीने स्वच्छ केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच वेळी, देशपातळीवरील महत्त्वपूर्ण समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या तटकरेंच्या या दौऱ्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या डिझेल दरातील सवलतीबाबतच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

दौऱ्याच्या निमित्ताने जेट्टीची स्वच्छता

रेवस-करंजा जलवाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून जेट्टीवरील अस्वच्छता, बोटींचे पडून राहिलेले अवशेष आणि कचऱ्याच्या साम्राज्याचा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होता. मात्र, खासदारांच्या आगमनाची चाहूल लागताच प्रशासनाने तातडीने मोहीम राबवून जेट्टी परिसर स्वच्छ केला. ‘लोकप्रतिनिधी येणार असतील तरच प्रशासन जागे होणार का?’ असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाच्या या दुटप्पी कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मच्छीमारांचे तटकरेंच्या पुढाकाराकडे लक्ष

दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करंज्यासह संपूर्ण कोकणातील मच्छीमार बांधवांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. शासनाने मासेमारीला शेतीचा दर्जा दिला असला, तरी महागड्या डिझेलमुळे पारंपरिक मासेमारीचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे. बोटींचा वाढता देखभाल खर्च आणि डिझेलच्या भडक्यामुळे मच्छीमार व्यवसाय संकटात सापडला आहे.

सुनील तटकरे हे स्वतः पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करून मच्छीमारांसाठी डिझेलवर विशेष सवलत, सबसिडी किंवा स्वतंत्र दरव्यवस्था लागू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. आता तटकरेंच्या या दौऱ्यामुळे जेट्टीप्रमाणे मच्छीमारांचे प्रश्नही मार्गी लागणार का, याकडे संपूर्ण किनारपट्टीचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!