श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आज पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र गरड, मुख्याधिकारी श्री. कुंभार, नगराध्यक्ष श्री.अतुल चौगुले आणि उपनगराध्यक्ष श्री.अनंत गुरव यांनी श्रीवर्धन शहरातील मुख्य बाजारपेठेची पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगतचे अतिक्रमण, अनियंत्रित पार्किंग तसेच मच्छी व भाजी मार्केटमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांवर पाहणीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. मच्छी व भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था, नागरिकांसाठी नियोजित पार्किंग व्यवस्था तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक (वन-वे) व्यवस्था लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व उपाययोजनांची लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
श्रीवर्धन शहरात पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होते. त्यामुळे अतिक्रमण हटविणे, बाजारपेठेचे नियोजन, पार्किंगची सुविधा आणि वन-वेची अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागून नागरिक तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रशासनाच्या या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास श्रीवर्धन शहरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
