उरण : अनंत नारंगीकर
ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून अल्पवधीत मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवून उरण येथील एका २५ वर्षीय ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची १ कोटी २७ लाख ३१ हजार २०२ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम रामचंद्र घरत (वय २६, रा. विंधने-धाकटी जुई, ता. उरण) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये शुभम यांना एका मित्राकडून ‘Khelo24match’ या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली होती. अधिक नफा मिळवण्याच्या आमिषाने त्यांनी या अॅपवर खाते सुरू केले.
सुरुवातीला ‘अंदर-बाहर’, पोकर, कॅसिनो, तीन पत्ती आणि क्रिकेट या खेळांमध्ये कमी रक्कमेच्या पैज जिंकल्यानंतर त्याची रक्कम खात्यावर जमा झाली. यामुळे शुभम यांचा या अॅपवर विश्वास बसला. मात्र, त्यानंतर झालेल्या आर्थिक तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि जिंकलेली रक्कम काढून घेण्यासाठी (Withdrawal) भामट्यांनी त्यांना अधिक पैसे भरण्यास भाग पाडले.
९ ऑक्टोबर २०२४ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत शुभम यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मित्राच्या कॅनरा बँकेच्या खात्यावरून क्यूआर कोड व यूपाआय (UPI) द्वारे तब्बल २२० हून अधिक व्यवहारांतून १,२७,३१,२०२ रुपये विविध अनोळखी खात्यांवर वर्ग केले. मात्र, तरीही जिंकलेली रक्कम किंवा गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सायबर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. कोणत्याही अनोळखी किंवा अनधिकृत ऑनलाईन गेमिंग व बेटिंग अॅप्सवर विश्वास ठेवू नका. पैशांचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन गेमिंगपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
