डीआरआयची मोठी कारवाई; मक्याच्या गोणींत लपवून अमली पदार्थांची तस्करी, दोघे ताब्यात
उरण । घन:श्याम कडू
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीए बंदराजवळील एका कंटेनर फ्रेट स्टेशनवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. मक्याच्या गोणींत लपवून परदेशात पाठविण्यात येत असलेला ५५ किलो मेथाम्फेटामाइनचा साठा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर जेएनपीए परिसरातील संबंधित कंटेनरची कसून तपासणी करण्यात आली. कंटेनरमध्ये मक्याच्या गोणींत संशयास्पद पदार्थ लपवून नेण्यात येत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पदार्थाची प्राथमिक चाचणी केली असता तो उच्च दर्जाचा मेथाम्फेटामाइन असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक तपासानुसार, या तस्करीचा संबंध पाकिस्तानस्थित अमली पदार्थ तस्कर महंमद हुसेन दाद याच्या सिंडिकेटशी असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सिंडिकेट मालवाहू कंटेनरच्या माध्यमातून विविध देशांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी सक्रिय असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या सिंडिकेटच्या हँडलर्सनी मुंबईतील आयात-निर्यातदार कंपन्यांशी संपर्क साधून उत्तर प्रदेशातील एका व्यापारी संस्थेच्या माध्यमातून सुमारे २२ टन मका परदेशात निर्यात करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी सुमारे १७.५ टन मका पॅक करून जेएनपीए येथील सीएफएसमध्ये आणण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी कंटेनरची बारकाईने तपासणी केली असता मक्याच्या एका गोणीमध्ये अमली पदार्थ लपवण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने केलेल्या चाचणीत तो मेथाम्फेटामाइन असल्याचे स्पष्ट झाले. डीआरआयने तातडीने ५५ किलो अमली पदार्थ जप्त केला.
या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. अमली पदार्थांचा स्रोत, तस्करीमागील सूत्रधार, देशांतर्गत नेटवर्क आणि अंतिम ठिकाण याबाबत तपास यंत्रणा माहिती गोळा करीत आहेत.
जेएनपीए हे देशातील महत्त्वाचे बंदर असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात मालाची वाहतूक होते. अशा संवेदनशील बंदर परिसरातून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ परदेशात पाठविण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केंद्र सरकारकडून कठोर कारवाई सुरू असताना जेएनपीए परिसरातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या कारवाईमुळे तस्करीचे संपूर्ण आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस येणार का आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
