पलंगावरून पडल्याचा रचला बनाव; शवविच्छेदन अहवालाने फुटले बिंग
उरण । विठ्ठल ममताबादे
“तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय,” असा हट्ट धरल्याच्या रागातून एका क्रूर सावत्र पित्याने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधील फणसवाडी (मोरा) येथे उघडकीस आली आहे. हत्येनंतर अपघात दाखवून परस्पर अंत्यसंस्कार उरकण्याचा आरोपीचा डाव मोरा सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. याप्रकरणी आरोपी सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.
मोक्ष (वय ३ वर्षे ५ महिने) असे मृत बालकाचे नाव असून, आरोपी जितेंद्र प्रदीप भिसे (२८) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
१४ ऑगस्ट रोजी दुपारी घरात मोक्ष आणि जितेंद्र हे दोघेच असताना मोक्षने आपल्या खऱ्या वडिलांकडे जाण्याचा हट्ट धरला. या निष्पाप शब्दांचा भयंकर राग आल्याने संतापलेल्या जितेंद्रने मोक्षचे डोके थेट भिंतीवर आपटले आणि लाकडी काठीने पायांवर बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने सोफ्यावर पाडून त्याच्या छातीवर जोरात मुक्का मारला. या जबर मारहाणीत बरगड्या तुटल्याने आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोक्षचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
अपघाताचा बनाव अन् पोलिसांची सतर्कता
हत्या लपवण्यासाठी आरोपी जितेंद्रने मोक्ष खेळताना पलंगावरून खाली पडल्याचा बनाव रचला. त्याला उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर आरोपीने पोलिसांना न कळवता गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याची घाई सुरू केली.
संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच मोरा सागरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. १५ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात (Adv. Death Certificate) डोक्याला गंभीर दुखापत आणि बरगड्या फॅक्चर झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. डॉक्टरांच्या या निष्कर्षानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी जितेंद्रने हत्येची कबुली दिली.
“आरोपी जितेंद्र भिसे याला हत्या आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.”
— राहुल कटवाणी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा सागरी पोलीस ठाणे)
