• Wed. Aug 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मानसिकदृष्ट्या अक्षम मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी

ByEditor

Aug 19, 2026

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; १ लाखाचा दंड अन् भरपाईचा आदेश

माणगाव । सलीम शेख
८० टक्के मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सदानंद काशिनाथ कदम असे या नराधमाचे नाव असून, न्यायाधीश श्री. मुकेश पाटील यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

काय आहे प्रकरण?

घटना २२ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटलज खुर्द येथे घडली. पीडित मुलगी घरात न दिसल्याने तिच्या वडिलांनी शोध घेतला असता, शेजारच्या घराच्या व्हरांड्यात आरोपी सदानंद कदम तिच्यावर अत्याचार करत असल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. वडिलांना पाहताच आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६ आणि ३७६ (२) (एल) अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

पोलिसांचा तपास आणि न्यायालयात भक्कम पुरावे

पाली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून वैद्यकीय प्रमाणपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि महत्त्वाचे कागदपत्र गोळा करून माणगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयात झाली. पीडित मुलगी ८० टक्के मानसिकदृष्ट्या अक्षम असल्याने तिची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली नाही. मात्र, अतिरिक्त सरकारी वकील श्री. जितेंद्र म्हात्रे यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा (Precedents) दाखला देत एकूण १० साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, पंच, विशेष शिक्षिका, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.

न्यायालयाचा कठोर निकाल

सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरत सत्र न्यायाधीश मुकेश पाटील यांनी आरोपी सदानंद कदम याला दोषी ठरवले.

  • दंडाची व शिक्षेची तरतूद: भादंवि कलम ३७६ व ३७६ (२) (एल) नुसार आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५,००० रुपये दंड सुनावण्यात आला.
  • पीडितेला भरपाई: नुकसानभरपाई योजनेनुसार (Compensation Scheme) आरोपीने पीडित मुलीस १,००,००० रुपये (एक लाख रुपये) देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या खटल्यात पैरवी अधिकारी आणि पाली पोलीस ठाण्याच्या कोर्ट कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!