जुन्या पंचायत समितीची इमारत बनली धोकादायक; कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
माणगाव | सलीम शेख
तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणी पुरवणाऱ्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कार्यालय आणि तालुका सार्वजनिक आरोग्य विभाग सध्या पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. जुन्या पंचायत समितीच्या जीर्ण इमारतीभोवती पावसाचे पाणी साचल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना चिखलातून वाट काढत कार्यालयात जावे लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या कायम असूनही वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाचे त्याकडे लक्ष नसल्याने माणगावकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच आवारातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकालाही पाण्याने वेढले असून, अशाच चिखल-पाण्याच्या परिस्थितीत १५ ऑगस्टचा ध्वजारोहण सोहळा पार पडल्याने प्रशासनाच्या अनास्थेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. याशिवाय परिसरातील ‘सर्व शिक्षा अभियाना’ची इमारत गळकी आणि धोकादायक झाली असून, वापरात नसलेल्या इतर शासकीय इमारतींची देखभाल न झाल्याने त्यांना भूतबंगल्याचे स्वरूप आले आहे.
परिसरात अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने, उघड्यावरील मुतारीचा वापर, वाढलेली झाडे-झुडपे आणि पसरलेली अस्वच्छता यामुळे संपूर्ण परिसराला बकालपण आले आहे. एका बाजूला नवीन इमारती उभारल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता वाया घालवली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
पाणीपुरवठा आणि आरोग्य विभाग ही नागरिकांच्या दैनंदिन कामांशी संबंधित महत्त्वाची कार्यालये असल्याने ती तातडीने नवीन व सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच या परिसरातील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अनधिकृत वाहनांवर कारवाई करून परिसर झाडे-झुडपांपासून मुक्त करावा, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कार्यालयेच अस्वच्छतेच्या विळख्यात असतील, तर प्रशासनाने जनतेला स्वच्छतेचा संदेश कसा द्यावा, असा संतप्त सवाल उपस्थित करत माणगावकरांनी आता तरी प्रशासनाने यावर तात्काळ ठोस कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
