कोलाड | विश्वास निकम
रोहा तालुक्यातील आंबेवाडी (कोलाड) येथील दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. महामार्गालगत आणि कालव्याच्या बाजूला अस्ताव्यस्त टाकलेल्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी पसरली असून परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे आंबेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी नाका हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे वर्षभरात दर रविवारी मोठा आठवडा बाजार भरतो. भाजीपाला, सुकी व ओली मच्छी, कपडे आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी सुमारे ७० ते ७२ वाड्या-वस्त्यांमधील हजारो नागरिक येथे येत असतात. मात्र, सध्या बाजाराच्या लगत आणि कालव्याच्या परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. ग्राहकांना नाकाला रुमाल लावूनच बाजारात खरेदी करावी लागत आहे.
प्रमुख समस्या आणि परिणाम
व्यवसायावर प्रतिकूल परिणाम: अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटत असून, विशेषतः भाजीपाला व मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायावर याचा वाईट परिणाम होत आहे.
विद्यार्थी व पादचाऱ्यांना त्रास: बाजाराजवळच ‘एम.पी.एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल’ शाळा असून, कालव्याच्या मार्गाने शेकडो विद्यार्थी व नागरिक रोज ये-जा करतात. त्यांना या घाणीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साथीच्या आजारांची भीती: सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कचरा सडून दुर्गंधी अधिकच वाढली आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची तत्काळ दखल घेऊन बाजारातील कचऱ्याची निर्जन स्थळी योग्य विल्हेवाट लावावी, अशी आग्रही मागणी आंबेवाडी परिसरातील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून होत आहे.
